Thursday, September 26, 2019

संगमेश्वर मधील कोसुंब-देवरुख मार्गावरील खड्ड्यांमुळे मानदुखी-पाठ्दुखीमुळे नागरिक त्रस्त;लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त.


संगमेश्वर मधील कोसुंब-देवरुख मार्गावरील खड्ड्यांमुळे मानदुखी-पाठ्दुखीमुळे नागरिक त्रस्त;लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त.

(सदर लेख हा संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून लेखक अमोल गायकर लिखित आहे)
संगमेश्वर(अमोल गायकर):कोकणातील संगमेश्वर तालुका म्हटला कि,देवभूमी,स्मारक पुरातन मंदिरे आणि शिवकालिन वास्तु यांनी नटलेला एक स्वर्गच म्हणता येईल.निवडणूक आली कि, “दे नारळ आणि कर भूमिपूजन” अशी राजकिय नेत्यांची नाटके सुरु होतात,आणि मतदार त्यांना भुलतात असेही चित्र समोर येते.गेले एक ते दीड वर्ष संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब  शाळेच्या जवळून देवरुख च्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तसेच मच्छीमार्केट पूल,मैत्री पेट्रोल पंप,कांजीवरा त्याचप्रमाणे संगमेश्वर तालूक्यातील प्रसिद्द तिर्थक्षेत्र “श्री मार्लेश्वर” या देवस्थानाच्या दिशेने जाणारा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.हे मुख्य मार्ग हे तेथिल नागरिकांच्या रोजच्या प्रवासात येणारे असल्याने थोडक्यात हे मार्ग सामान्य नागरिकांसाठी “लाईफलाईन” म्हणून ठरतात.संगमेश्वर तालुक्यातील देवरुख हे शहर म्हणजे तालुक्याचे काळीज आहे .देवरुख शहरामध्ये तालुक्याची शासकिय कार्यालये,उपजिविकेचा मार्ग,शाळा-महाविद्यालये,पोलिस ठाणे,एस.टी डेपो,महत्वाची रुग्णालये,आई सोळजाई चे प्राचिन मंदिर अशा अनेक विविधतेने नटलेल्या देवरुखला नागरिकांचा रोजचा संपर्क असतो.एवढेच नाहीतर आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा संपर्क साधणारा मार्ग हाहि खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.काहि दिवसांपूर्वी याच मार्गाच्या विकासासाठी कोट्यावधी निधी मिळाला असल्याचा प्रचार हि जोरदार सुरु होता मग हा त्रास नागरिकांना का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.निवडणूक आली कि,राजकिय नेते संगमेश्वर आपले घर समजून ठाण मांडतात ,मोठमोठी आश्वासने हि देतात आणि नंतर पुन्हा ५ वर्ष “जैसे थे” परिस्थिती आहे.संगमेश्वर सारख्या विविध अलंकाराने नटलेल्या स्वर्गाला आणि अतिमहत्वाच्या देवरुख शहराच्या काळजाला छिद्रे पाडण्याचे काम लोकप्रतिनिधी करताना दिसून येत आहेत.याच संगमेश्वर मध्ये दोन महत्वाची पदे सांभाळणारे आमदार हि झाले पण ते सुद्धा सर्व पाहून शांत बसल्याचे दिसून येते.संगमेश्वर तालुका खड्डेमय झाला असून नक्कीच जर खड्डेगणना झाली तर विक्रमी नोंद व्हावी अशीही इच्छा बाळगणारे लोकप्रतिनिधी स्वार्थापोटी जनेतला वेठीस धरण्याचे काम करित असल्याचे स्पष्ट होत आहे.
          मागील काही दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने या मार्गावरील खड्डे चिखलाने भरले पण शासनाच्या ढिसाळ कारभाराचे पितळ मात्र उघडे पडले.एखादा मंत्री किंवा मोठा नेता यायचा म्हटल्यास हे रस्ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुरुस्त केले जातात हेही आता जनतेला समजले आहे.संगमेश्वर तालुक्यातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले असून नागरिकांना या त्रासाला रोजच बळी पडावे लागत आहे.या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना ,एस.टी प्रवाशांना आणि ईतर सर्व प्रवाशांना पाठदुखी-मानदुखी,मणक्याचे आजार तसेच पायांच्या स्नायूंचे आजाराला बळी पडावे लागत आहे.नागरिकांना त्यांच्या जीवनात आधीच महागाई आणि त्यात या आजारच्या त्रासाचा तणाव यामुळे उच्च रक्तदाब ,मानसिक तणावपूर्ण जगावे लागत आहे.आपण खात असलेल्या अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष अन्नात असलेल्या भेसळीमुळे हाडांना होणारा कॅल्शिअम चा अपुरा पुरवठा,सूर्यप्रकाशाचा अभाव यांच्यामुळे मानवी शरीरातील हाडांची झीज होण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यांमध्ये भर म्हणून या रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यामुळे होणाऱ्या दुखापती,आजार .खड्ड्यांतून रोजचा प्रवास करताना अनेकांच्या गाड्यांना झटके बसत असल्याने,एस.टी चालक ,रिक्षाचालक आणि रोजची बाइकस्वार यांना या पाठदुखी-मानदुखी ,मणक्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे आणि त्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे.चारचाकी वाहने सुरक्षित असतात पण त्या वाहन चालकांना सुद्धा या खड्ड्यांच्या झटक्यामुळे पायांवर येणारा ताण स्नायुंवर भार देतो तसेच त्यांना पायांच्या हाडामध्ये येणाऱ्या दोषाला बळी पडावे लागते.एखादा गंभीर रुग्ण ,प्रसूतीसाठी जाणारी महिला यांना घेवून जाणारी रुग्णवाहिका हि या खड्यांमुळे उशिरा तसेच खड्डेमय रस्त्यामुळे “मौत का कुआ” सारखी सर्कस करावी लागल्याने कधी कधी जीवितहानी सारख्या दुर्घटनेला बळी पडावे लागते.विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्ड्यात अजून भर म्हणून नादुरुस्त गतीरोधक,रस्ते दुरुस्त करण्यासाठी सुरु असलेली अपूर्ण कामे यांच्यामुळे अपघातासारखे प्रकार वाढत निघाले आहेत.हा प्रकार नागरिकांच्या जीवांशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.हा खड्डे अपघात ,त्यामुळे होणारा त्रास हा दहशती ह्ल्ल्यांपेक्षा कईक पट्टीने जास्त असून नागरिक ताणतणावामध्ये जगताना दिसून येत आहे.उपजीविकेसाठी घेतलेली रिक्षा,बाईक इतर वाहने यांच्या मालकांना हे आजार खर्च  आहेतच आहेत पण याच खड्ड्यांमुळे वाहनांना होणाऱ्या दुरुस्तीचा खर्च हि त्यांच्या तुटपुंज्या कमाईवर भर देतो त्यामुळे त्यांचे जीवन मानसिक तणावग्रस्त असून धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येते.या सर्वांमध्ये मात्र लोकप्रतिनिधी,शासकिय ठेकेदार,अधिकारी  हे खेळीमेळीचे जीवन जगताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे सरकारी रुग्नालायातील अपुऱ्या सेवेमुळे बाकीच्यांना सुद्धा जीवन खेळण्याचे वाटू लागले आहे.. भविष्यात या भ्रष्ट कारभाराला नक्कीच वाचा फुटेल पण त्याआधी नागरिकांनी सुद्धा यावर आवाज उठवून क्रांती करावी अशी सामाजिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.संगमेश्वर,देवरुख,कोसुंब,मार्लेश्वर, ताम्हाणे यांसारख्या विविधतेने नटलेल्या निसर्गमय अलंकारांची जडण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्वर्गामय सौंदर्याला मात्र गालबोट लावण्याचे प्रकार या लोकप्रतिनिधी कडून केले जातात तरीही अशा भ्रष्ट प्रवाहात वाहणाऱ्या नागरिकांची कीव येतेच परंतु  त्यांच्या या अन्याय सहन करून शांत बसण्याची शोकांतिका वाटते.
लेखक
अमोल (भंडारा)लवु गायकर
*संगमेश्वर टाईम्स*
माहिती अधिकार कार्यकर्ता   
मोबा-८८९८५४५०७०






No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...